ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता आई-वडिलांना मासिक निर्वाह भत्ता दिला नाही. तसेच, घराच्या भिंतीवर काळ्या रंगाने काहीही लिहून विद्रूपीकरण करून मानसिक छळ केल्याप्रकरणी मुलावर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेश वसंत जामदार (वय ४२, रा. सिंहगड रोड, धायरी) असे गुन्हा दाखल केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्यावर ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण व कल्याण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६३ वर्षाच्या वृद्ध आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. राजेश हा आई-वडिलांना सांभाळत नसल्याने आई-वडिलांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडे तक्रार दिली होती. निर्वाह न्यायाधिकरण न्यायालयाने तक्रारदार आई-वडिलांना मासिक निर्वाह भत्ता देण्याचे आदेश मुलगा राजेश याला दिले होते. मात्र, राजेशने न्यायालयाने ठरवून दिलेला निर्वाह भत्ता आई-वडिलांना दिला नाही. तसेच घराच्या भिंतीवर काळ्या रंगाने काहीही लिहून भिंतीचे विद्रूपीकरण करून मानसिक छळ केला. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.