११ जानेवारी २०२०,
संत गोरोबाकाका साहित्य नगरी, उस्मानाबाद
देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शुक्रवारी एल्गार पुकारला. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरून अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी (मॉब लिंचिंग), विरोधी मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकारांविरोधात सारस्वतांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला. ‘देशाला वेठीस धरले जात आहे,’ अशी सडकून टीका साहित्यिकांनी केली.
उस्मानाबाद येथील ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रानकवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाले. ९२व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी ९३व्या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. दिब्रिटो, महानोर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री अनुराधा पाटील अनुराधा पाटील आणि ढेरे यांनी समाजवास्तवावर बोट ठेवत चौफेर हल्ला चढवला. ‘धर्म, जात आणि पंथावरून भेदभाव करणे अमानुषपणाचे लक्षण आहे. एखाद्याचा जीव घेणे, विद्यार्थ्यांना मारहाण करणे ही भारतीय संस्कृती आहे का? हे प्रकार आम्ही सहन करणार नाही. मग तुम्ही आमचे काही करा. बेरोजगारी, आर्थिक आणि जगण्याचे प्रश्न असताना आपण कुठे लक्ष देत आहोत? हा मूलतत्त्ववाद परवडणारा नाही,’ अशी टीका दिब्रिटो यांनी केली. तर, ‘या देशाला कुठलीही जात वा धर्म नाही,’ असे ठणकावून, ‘आंदोलन करणारी माणसे देशद्रोही, असे म्हणण्याइतका करंटेपणा महाराष्ट्रात नाही,’ असा टोला महानोर यांनी लगावला.