२ डिसेंबर २०२०,
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये उच्चांकी मतदान झाले असल्याने निवडणूक निकाल येण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी गेल्या निवडणुकीत अनुक्रमे सरासरी २२ टक्के आणि तीन टक्के मतदान झाले होते. यंदा यादीतील त्रुटींमुळे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच होणाऱ्या निवडणुकीत फारसे मतदान होणार नसल्याचा अंदाज मतदारांनी खोटा ठरवला असून यंदा उच्चांकी मतदान झाले आहे. या निवडणुकीत पसंतीक्रमाने मतदान करण्याची प्रक्रिया आणि पदवीधरसाठी ६२, तर शिक्षकसाठी ३५ उमेदवार रिंगणात असल्याने मतमोजणी करण्यासाठी किमान दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबर रोजी रात्री किंवा ४ डिसेंबरला प्रशासनाकडून अधिकृत जाहीर होणार आहे.
‘विभागाच्या पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिका बालेवाडी येथे आणण्यात येणार आहेत. त्यानंतर ३ डिसेंबरला सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून करोनाच्या पार्श्वभूमीवर शरीर अंतराचे पालन करूनच ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मतमोजणीचे काम वाटून देण्यात आले आहे. यंदा दोन्ही मतदारसंघांमध्ये जास्त उमेदवार, करोनामुळे वाढवण्यात आलेली मतदान केंद्रे आणि उच्चांकी झालेले मतदान या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या प्रक्रियेस वेळ लागणार आहे,’ अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.