२२ सप्टेंबर २०२०,
आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या जागेचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सुशोभिकरण करून उद्यान व पार्क विकसित करण्याचे नियोजन आहे. परंतु हा विषय नवनगर विकास प्राधिकरण, महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित आहे. या तांत्रिक अडचणी सोडवून हा प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा सुरू असून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे अ प्रभागाच्या अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका शर्मिला बाबर यांनी सांगितले आहे.
आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या बाजूने व रेल्वेमार्गालगत सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा मोकळा भुखंड आहे. यापैकी काही जागा रेल्वे प्रशासनाच्या किंवा काही पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या आहेत. या मोकळ्या जागेलगत प्राधिकरणाने सुनियोजित गृहसंकुले विकसित केली आहेत. त्यामुळे या भागात मोठया प्रमाणात नागरीवस्ती आहे. रेल्वे स्थानक, विविध महाविद्यालये, शाळा या भागात आहेत. परंतु, ही जागा मोकळी असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य पसरले.जागेचा गैरवापर होतो. यापूर्वी या जागेत श्वान उद्यान व पक्षी उद्यान ही संकल्पना राबविण्याचे नियोजन झाले होते. परंतु, रेल्वे, नवनगर विकास प्राधिकरण आणि महानगरपालिका याच्या नियोजनात हा प्रकल्प प्रलंबित आहे.
नवनगर प्राधिकरण प्रशासनाने येथील सुशोभिकरणासाठी अटी-शर्तीसह जागा महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यास परवानगी दिली होती. सद्यस्थितीत येथील काही जागा ही रेल्वेच्या चौपदरीकरणासाठी मंजूर असल्याने रेल्वे प्रशासनाकडून सुशोभिकरणासाठी मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या मुळ प्रस्तावाची मागणी केली होती. त्यासाठी अ प्रभाग अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका शर्मिला बाबर यांनी नवनगर प्राधिकरणाकडे मुळ प्रस्ताव उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी हा मुळ प्रस्ताव उपलब्ध करून दिला आहे.
“रेल्वे प्रशासनाने या कामासाठी ना-हरकत दिल्यास महानगरपालिकेच्या वतीने हा प्रकल्प हाती घेता येणार आहे. या जागेचा सदुपयोग व्हावा, तसेच आकुर्डी स्थानकासह प्राधिकरण परिसरातील शोभा वाढविण्यासाठी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. त्याकरिता सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. येथे गार्डन, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक यासह उत्कृष्टपणे सुशोभिकरण करणे शक्य होईल. येथे निरनिराळी झाडे लावून त्याचे संवर्धन केले जाईल”.
– शर्मिला बाबर, अध्यक्षा, अ प्रभाग कार्यालय, पिंपरी -चिचंवड महापालिका