21 November 2020.
2021च्या सुरुवातीच्या दोन तीन महिन्यात कोरोनावरची लस उपलब्ध झालेली असेल असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं. ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत 30 कोटी जनतेला लस देण्याची तयारी असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या दाव्यानुसार, दर महिन्याला 50 ते 60 दशलक्ष लशीचे डोस तयार करण्याच्या स्थितीत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
फेब्रुवारी 2021 पर्यंत 100 दशलक्ष लशीचे डोस दर महिन्याला तयार होऊ शकतील असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
भारत सरकार आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांचा नेमका करार काय झाला आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
सीरम इन्स्टियूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी सरकारने जुलै 2021 पर्यंत 100 दशलक्ष लशीच्या डोसची मागणी केल्याचं सांगितलं.
जुलै 2021 पर्यंत केंद्र सरकारने 300 दशलक्ष लशीचे डोस जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे.
लशीचे हे डोस सरकार सीरम इन्स्टिट्यूट कडून घेणार का अन्य कुठल्या संस्थेकडून याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
आम्ही आमच्याकडून भारत सरकारला जुलैपर्यंत 300 दशलक्ष डोस देण्याची तयारी केली असल्याचं पुनावाला यांनी म्हटलं आहे.
याव्यतिरिक्त सीरम इन्स्टिट्यूट, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे लस संपूर्ण जगात पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या कोवॅक्स योजनेचा भाग आहे.
संस्थेने या उपक्रमासाठीही लस देण्याची तयारी केली आहे. प्रत्येक देशाच्या गरजेनुसार लशीचे डोस पुरवण्यात येतील.