Monday, April 22, 2024
Homeआरोग्यविषयककोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ… लसीवर कोविड योद्ध्यांचा पहिला हक्क -पंतप्रधान मोदी

कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ… लसीवर कोविड योद्ध्यांचा पहिला हक्क -पंतप्रधान मोदी

१६ जानेवारी २०२१,
गेल्या अनेक महिन्यांपासून देशवासीयांच्या नजरा लागलेल्या करोना लसीच्या वापराला अखेर आजपासून सुरूवात झाली. बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन करत संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले,”काही वेळात देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचं अभिनंदन करतो. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात आधी करोना लस मिळेल,” असं मोदी यांनी स्पष्ट केलं.

लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मोदी म्हणाले,”भारतातील लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ज्या सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सर्वात आधी लस दिली जाईल. ज्याला करोना होण्याचा धोका सर्वाधिक आहे, त्या व्यक्तींना सर्वात आधी लस मिळेल. आपले डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना सगळ्यात आधी लस दिली जाईल. या सगळ्यांचा करोना लसीवर पहिला हक्क आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि कायदा सुव्यस्थेची जबाबदीर असणाऱ्या लोकांना लस दिली जाईल,” असं मोदी म्हणाले.

“इतिहासात इतक्या व्यापक स्वरूपातील लसीकरण यापूर्वी कधीही झालं नाही. जगात १०० पेक्षा अधिक देश असे आहेत की, ज्यांची लोकसंख्या ३ कोटींपेक्षा कमी आहे. तर दुसरीकडे भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. मी सगळ्यांना आठवण करून देतो की, करोना लसीचे दोन डोस घेणं अत्यावश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचं अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आपल्या शरीरात करोना प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होईल,” असं मोदी म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची माहिती दिली. “पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोविड योद्ध्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना करोनाची लस देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल. तुम्ही कल्पना करू शकता की, ३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले फक्त तीनच देश आहे. चीन, अमेरिका आणि भारत,” असं मोदी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments