देशाभरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यातच लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी पुण्याने राज्यात, तर महाराष्ट्राने देशात लसीकरणाचा उच्चांक नोंदवला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले, “राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आज एकाच दिवशी ३ लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३,२९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३ लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे.”
“राज्यात आज आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून, एकाच दिवशी ५७ हजार जणांना लसीकरण करून पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला आहे. त्यापाठोपाठ मुंबईत देखील ५० हजार जणांचं लसीकरण आज झाले. आज अखेर महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे ६५ लाखांहून नागरिकांना लसीकरण करून पहिल्या क्रमांकात सातत्य राखलं आहे. करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
“कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे. आज तीन लाखांहून अधिक जणांना लसीकरण करण्यात आले,” असंही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.
लसीकरणाला वेग वाढत असताना राज्यात गुरुवारी आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ झाली. एका दिवसात राज्यात ४३ हजार १८३ रुग्ण आढळून आले आहेत.