मुंबई: कोरोना रूग्णसंख्ये उच्चांक गाठला असताना रुग्णांना मोठ्या संख्येने गृहविलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र या रुग्णांमुळे कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित होत असल्याचे प्रकार निदर्शनास येत असून त्रुटी दूर करण्यासाठी गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी नव्या सूचनांचा समावेश असलेली सुधारित नियमावली प्रशासनाने गुरुवारी जाहीर केली.
यानांच गृहविलगीकरणाची मुभा
’ जे रुग्ण करोना चाचणी केल्यानंतर बाधित आढळले आहेत, अशा रुग्णांना घरी विलगीकरण करता येऊ शकते.
’ लक्षणे नसलेले बाधित
’ सौम्य लक्षणे असलेले (म्हणजे ज्यांना सहव्याधी नाहीत, ताप १०० फॅरनहाईटपेक्षा कमी आहे, ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा अधिक)
’ प्रौढ व सहव्याधी असलेले रुग्ण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत अशा रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्षणे नसलेले बाधित (एसिम्प्टोमॅटिक) किंवा सौम्य लक्षणे असलेले बाधित म्हणून निर्देशित करणे आवश्यक असेल.
’ प्रसूतिकाळ दोन आठवड्यांवर असलेल्या गर्भवती महिलांना घरी विलगीकरण लागू नसेल. तर स्तनदा मातांच्या बाबतीत वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सक यांच्या विचारविनिमयानुसार योग्य निर्णय घेतला जाणार.
काय आहे नियमावली
’ संबंधित रुग्णाने पल्स ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मोमीटर, फेस मास्क, हातमोजे, निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) इत्यादी साधने बाळगून त्यांचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे.
’ विभाग कार्यालय, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्रकृतीबाबत विचारणा करण्यासाठी येणारे दूरध्वनी स्वीकारून अद्ययावत माहिती त्यांना कळवावी. महत्त्वाच्या आरोग्य निकषांच्या नोंदी ठेवाव्यात.
’ रुग्ण बरे झाल्यास त्यांचे विलगीकरण पूर्ण झाल्याबाबत प्रचलित वैद्यकीय उपचार पद्धतीनुसार वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सक संमतीने निर्णय घेतील.
’ रुग्णांच्या घरी स्वत:ला वेगळे करून घेण्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही विलगीकरणाच्या पुरेशा सुविधा असाव्यात.
’ रुग्णासाठी खेळती हवा असलेली खोली व स्वतंत्र प्रसाधनगृह असावे.
’ रुग्णाने कुटुंबातील इतर सदस्यांपासून विशेषत: सहव्याधी असलेली ज्येष्ठ मंडळी यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवावे.
’ घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णाबाबत नातेवाईक, शेजारी,
गृहनिर्माण पदाधिकारी, नियमित कौटुंबिक चिकित्सक यांना माहिती असणे आवश्यक .
रुग्ण किंवा संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.