केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, हरदीप सिंह पुरी आणि अश्विनी कुमार चौबे यांच्यासोबत बैठक केली. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोना रूग्णांची आकडेवारी दिली.
देशात आतापर्यंत 1 करोड़ 19 लाख 13 हजार 292 नागरिकांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचलेलं असतानाच आता ही आकडेवारी 91.22 टक्क्यांवर पोहोचली आहे. 149 जिल्ह्यांमध्ये मागील 7 दिवसांपासून एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही. तर, 8 जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसांपासून एकाही रुग्णाची नोंद नाही. असे तीन आणखी जिल्हेही आहेत तिथे 21 दिवसांपासून एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
सध्याच्या घडीला देशात 0.46 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 2.31 टक्के रुग्ण आयसीयुमध्ये आहेत. तर, 4.51 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.
‘देशातील कोरोना मृत्यूदर हा सातत्यानं कमी होत आहे. त्यातच आरोग्य विभागात काम करणाऱ्या जवळपास 89 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 54 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे,’ अशी माहिती हर्षवर्धन यांनी माध्यमांना दिली.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी एक परिपत्रक ट्विट करत त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनावर टीका केली होती. ‘गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे हे एकमेव राज्य कोरोना नियंत्रणातील देशाच्या लढाईत अडचणीचे ठरले आहे. आज महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नाहीत, तर जगातील सर्वाधिक संसर्ग दर सुद्धा महाराष्ट्रात आहे.’