मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. चित्रपटसृष्टीवरही याचा परिणाम होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांनी आपला अॅक्शन चित्रपट ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट जाहीर केली होती.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ गेल्या वर्षीच रिलीज करण्यात येणार होता. परंतु, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यावेळी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. तसेच देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं होणारी वाढ लक्षात घेता, या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्यात एक बैठक पार पडली होती.
दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार, गोविंदा, आलिया भट्ट, रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, क्रिती सेनन या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.