४ ऑक्टोबर २०२१,
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाची रखडलेली सुनावणी अखेर सुरू होत आहे. मुबंई उच्च न्यायालयात सोमवारी (४ ऑक्टोबर) ही सुनावणी होणार आहे, अशी माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी होणार असून यावेळी नियमित सुनावणीच्या तारखा ठरविल्या जाण्याची शक्यता आहे.
आधी इतर तांत्रिक अडचणी आणि नंतर लॉकडाऊन मुळे ही सुनावणी रखडली होती. सुनावणी सुरू करण्यासंबंधीची विनंती सरकारतर्फे अॅड. यादव यांनी सप्टेंबरमध्ये न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आता सुनावणीसाठी तारीख मिळाली आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. यामध्ये जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालवण्यात आला. जिल्हा न्यायालयात अवघ्या १६ महिन्यांत निकाल लागला. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. तीनही आरोपींना खून आणि बलात्कार या आरोपांसाठी फाशीची शिक्षा सुनावली. या फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरणासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फाशी निश्चिती करणाचा अर्ज दाखल दाखल केला होता. त्याचप्रमाणे यातील आरोपी संतोष भवाळ याने फाशीच्या शिक्षेच्या विरोधात अपील दाखल केले. यावर प्राथमिक सुनावणीनंतर २५ फेब्रुवारी २०२० पासून नियमित सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्याच काळात करोना संसर्गाचा शिरकाव झाला आणि पहिला लॉकडाऊन लागला व सुनावणी लांबणीवर पडली.
आता कोर्टाचे कामकाज सुरळीत सुरू झाल्याने सरकारतर्फे ही सुनावणी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करून सोमवारी सुनावणी ठेवली आहे. त्यामध्ये पुढील नियमित सुनावणीच्या तारखा ठरविल्या जाण्याची शक्यता आहे.