पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या शुद्धीकरणासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. भविष्यात या नद्या प्रदूषित होऊ नयेत यासाठी दोन्ही नद्यांच्या उगमापासून ते संगमापर्यंत नद्या शुद्धीकरण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, तसेच यासाठी महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सारख्या संबंधित शासकीय संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची एकत्रित समिती स्थापन करून कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आज सांडपाण्यामुळे इंद्रायणी व पवना नदीत होणाऱ्या जलप्रदुषणावर नियंत्रणात्मक उपाययोजना करणेबाबत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, उपायुक्त विठ्ठल जोशी, रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, विजयकुमार थोरात, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पर्यावरण विभागानी तयार केलेल्या संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. नाल्यांद्वारे नदीमध्ये कचरा, प्लॅस्टीक, दूषित पाणी जाऊ नये यासाठी नाल्यांवर मॅकेनिकल स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. तसेच शहरात अनेक ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले असून नवीन प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. नियंत्रणात्मक उपाययोजना संदर्भात कृती आराखडा उदय सामंत यांना सादर करताना त्यांनी भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची माहिती दिली.
महापालिका हद्दीतील पवना, इंद्रायणी नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी उगमापासून ते संगमापर्यंत लवकरच पाहणी करण्यात येणार आहे. शासन निधीतून आणि शासकीय संस्थांच्या सहभागातून नद्यांचे शुद्धीकरण होणार असून त्याचा पर्यावरणाला तसेच नागरिकांना उपयोग होईल, असेही उदय सामंत यावेळी म्हणाले. बैठकीचे प्रास्ताविक आयुक्त शेखऱ सिंह यांनी केले. सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार खासदार श्रीरंग बारणे यांनी मानले.