राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या कालीचरण महाराजला आज पुण्यात आणलं जाणार आहे. ३० डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली होती. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती. येथील टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आता पुणे पोलिसांनी कालीचरण महाराजला पुण्यातील नातूबाग येथे १९ डिसेंबरला शिव प्रताप दिनानिमित्त आयोजित भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कालीचरण महाराजविरोधात पुण्यातील खडक पोलीस स्टेशनकामध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर कालीचरण महाराजला आज पुणे पोलिसांनी रायपुर येथून ताब्यात घेतले आहे. दुपारी साडेतीन वाजता कालीचरण महाराजला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील नातूबाग येथे १९ डिसेंबरला शिव प्रतापदिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटेसह सहा जणांविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये २९ डिसेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे,मोहनराव शेटे,दीपक बाबुलाल नागपुरे, कालीचरण महाराज, कॅप्टन दिग्रेंद्र कुमार आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला.
चिथावणीखोर वाक्यप्रयोग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी नातूबाग येथे शिव प्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या जातील, तसेच धार्मिक श्रद्धेचा अपमान करून समाजात तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर भाषण मिलिंद एकबोटे यांनी केले. तसेच नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांनी देखील सूत्रसंचालन करतेवेळी भडकाऊ आणि चिथावणीखोर वाक्यप्रयोग केला आहे. या प्रकरणी कॉन्स्टेबल सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपुरे, कालीचरण महाराज, कॅप्टन दिग्रेंद्र कुमार आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला