महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी तेरा महिलांच्या मुलाखती
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढील वर्षी होणा-या सार्वत्रिक निवडणूका कॉंग्रेस आत्मविश्वासाने लढणार आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमाव्दारे नागरीकांशी संवाद साधण्यात येत आहे. तसेच चांद्यापासून बांध्यापर्यंत कॉंग्रेसची महिला संघटना बांधण्याचे काम सक्षमपणे सुरु आहे. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मुलाखती घेण्याच्या कार्यक्रमास मिळालेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष उल्लेखनिय आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असणा-या महिलांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, नवी मुंबई महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा उज्वला सावळे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस संगिता तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी नगरसेविका निर्मला कदम तसेच प्रा. शैलजा सांगळे, भारती घाग आदी उपस्थित होते. यावेळी संध्या सव्वालाखे आणि संगिता तिवारी यांनी महिला शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असणा-या महिलांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये नंदाताई तुळसे, छाया देसले, सायली नढे, अनिता अधिकारी, सुप्रिया मलशेट्टी, सुप्रिया पोहरे, स्वाती शिंदे, शोभा पगारे, कमला श्रोत्री, शितल कोतवाल, तुलसी नांगरे, शिवानी भाट, प्रतिभा कांबळे यांनी मुलाखती दिल्या. यामध्ये वकील, सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधी, राजकीय क्षेत्रात व असंघटीत क्षेत्रात काम करणा-या महिलांचा समावेश होता. इच्छुक महिलांना पक्ष संघटना वाढीबाबत आणि आगामी निवडणूकांसाठी त्यांचे व्हिजन, नियोजन, महिलांचा राजकीय क्षेत्रातील सहभाग, महिला सबलीकरण, सामाजिक, आर्थिक, सक्षमीकरण या विषयी वैयक्तिक मुलाखती घेऊन प्रश्न विचारले आणि त्यांची संध्या सव्वालाखे व संगिता तिवारी यांनी मते जाणून घेतली.
यावेळी संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी मागील दोन महिन्यात पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार आहे. या महिला मेळाव्यास आणि सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महिला उद्योजकता सप्ताह प्रशिक्षण शिबीरास’ मिळालेला प्रतिसाद हजारो कुटूंबांना अर्थाजनासाठी मदतीचा ठरणार आहे. या इच्छुक महिलांमधून तीन महिलांची नावे वरिष्ठांकडे अहवाल देऊन सादर करण्यात येणार आहेत. नविन वर्षांच्या सुरुवातीलाच यातील एका महिलेचे नाव शहराध्यक्षपदासाठी जाहिर करण्यात येईल असेही संध्या सव्वालाखे यांनी सांगितले.प्रास्ताविक, स्वागत माजी नगरसेविका निर्मला कदम, सुत्रसंचालन नरेंद्र बनसोडे आणि आभार विरेंद्र गायकवाड यांनी मानले.