देशात पुरेसा कोरोना लसींचा साठ नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण मोहिम बंद पडल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, “आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींच्या निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे. लसी जलदगतीने उपलब्ध व्हायला हव्यात,” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
तसेच, “वाढत्या कोरोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
“देश या क्षणाली महामारीच्या दुसऱ्या लाटेशी झगडत आहे. आपल्या शास्त्रज्ञ व डॉक्टरांनी मिळून कोरोना नष्ट करण्यासाठी लस बनवली. मात्र सरकारने लसीकरण कार्यक्रमाची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही. देशात एवढ्या हळूवारपणे लसीकरण सुरू आहे की, ७५ टक्के लोकांना लस देण्यासाठी वर्षांचा कालावधी लागेल.” असं देखील राहुल गांधींनी बोलून दाखवलं आहे.