नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना कोरोनाच्या लसीकरणावरुन राजकारण सुरू झाल्याचं दिसून येतंय. कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची ठराविक अट लादली असताना सरसकट सर्वांनाच कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. वयाची अट घालणे म्हणजे निरर्थक वाद आहे असंही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “गरजा आणि मागणी यांत वादविवाद करणे हास्यास्पद आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे.”
देशातील डॉक्टरांची अग्रणी असलेली संस्था इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी लसीकरणासाठी देशभरात वयाची अट 18 इतकी करावी अशा मागणीचे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. कोरोनाविरोधातील लस राज्यातील सर्व तरुणांना मिळावी म्हणून लसीकरणासाठी असणारी वयाची अट शिथिल करून 25 करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लसीकरसाठी वयाची अट असून नये असं सूचित केलंय.