१० एप्रिल २०२१,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. सामान्यांशी नाळ जोडलेला आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. एरवी साधा नगरसेवक म्हटलं तरी त्या नेत्याच्या श्रीमंतीचा थाट डोळे दिपवणारा असतो. मात्र, रावसाहेब अंतापूरकर यांनी कधीही बडेजाव न मिरवात शेवटपर्यंत आपला साधेपणा जपला. एवढंच काय दोन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांचा मुक्काम शेवटपर्यंत भाड्याच्या घरातच होता.
त्यांच्या निधनाची माहिती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्वीट करून दिली. “माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना,” अशी माहिती देत अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
कोरोनामुळे घात झाला
साधारण 25 दिवसांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यावर नांदेडच्या भगवती रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 12 दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रावसाहेब अंतापूरकर यांना मधूमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळत होते. दरम्यानच्या काळात त्यांना हृदयविकाराचा एक झटकाही येऊन गेला होता.
कोण होते रावसाहेब अंतापूरकर?
सामान्यांचा आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. देगलुर तालुक्यातील अंतापूर येथील जयंतराव उर्फ रावसाहेब अंतापूरकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देगलुर मानव्य विकास शाळेत झाले. त्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 2009 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी बाजी मारली. तर 2019 मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणेंचा पराभव केला होता.
रावसाहेब अंतापूरकर यांनी कधीही बडेजाव न मिरवात शेवटपर्यंत आपला साधेपणा जपला, रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात असून, आमदार अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. अंतापूरकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत दोन आमदारांना करोनामुळे प्राण गमावावा लागला आहे.