NEET परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चर्चा रंगलीय ती, या परीक्षेवर झालेल्या आरोपांची. एका परीक्षा केंद्रावरील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले? असा सवाल करत, देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.
आयुष्यात कधीतरी गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून रुग्णांची सेवा करण्याचं स्वप्न बघणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या हातात आता निषेधाचे फलक आणि तोंडात जोरदार घोषणा आहेत. त्यांच्या या संतापाचं कारण आहे नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरप्रकराचं.
NEET परीक्षेच्या मार्कांवरील आक्षेप
NEET परीक्षेच्या निकालाच 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. निगेटिव्ह मार्किंग प्रणाली असताना पैकीच्या पैकी गुण कसे? 67 पैकी बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरचे असल्याचा आरोप करण्यात येतोय.
NEET परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून आता राजकीय नेत्यांनीही जारदार हल्लाबोल केलाय. ‘नीट’ प्रवेशपरीक्षेतील गैरकारभाराविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय शिक्षणाच्या ‘नीट’ या प्रवेशपरीक्षेमध्ये उत्तर भारतातील एका केंद्रातील विद्यार्थ्यांना वाढीव गुण देत उत्तीर्ण केल्याची घटना समोर आलीये. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून राज्यातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं कठीण होणार आहे. त्यामुळे ही प्रवेश परीक्षा रद्द करण्याची विनंती करणार असल्याचे व पर्यायी आवश्यकता भासल्यास न्यायालयातही याचिका दाखल करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.तर काँग्रेसचे नेते कन्हैय्या कुमार यांनी म्हटलंय की, नरेंद्र मोदी शिकले असते तर त्यांना विद्यार्थ्यांचं दु:ख कळलं असतं.
NEET परीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्यातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कमी आणि परीक्षेतील गैरप्रकाराचीच चर्चा अधिक रंगली. आता यावरून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्टीकरण दिलंय.
एनटीएने काय दिलं स्पष्टीकरण?
विद्यार्थ्यांच्या गुण मिळवण्याच्या क्षमतेत वाढ झाली.
मार्क देण्याच्या पद्धतीतही मोठे बदल झाले.
तिसरा पर्यायही निवडलेल्या विद्यार्थ्यांना गुण देण्याच्या पद्धतीमुळे जास्त गुण मिळाले
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची शक्यता निकालावरून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नीट परीक्षेत एवढे गुण मिळवणं शक्य आहे का? की यात कोणता मोठा घोटाळा झालाय का?
खरंतर डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र त्यातच जर गैरप्रकार होत असतील तर त्याची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आता केली जातेय.