Friday, September 11, 2026
Homeआरोग्यविषयकमहापौर विरुद्ध सत्तारूढ पक्षनेते संघर्ष..? वंदे मातरमवरून भाजपाचा महापालिका सभेत गोंधळ, सभा तहकूब

महापौर विरुद्ध सत्तारूढ पक्षनेते संघर्ष..? वंदे मातरमवरून भाजपाचा महापालिका सभेत गोंधळ, सभा तहकूब

याती एकाला जरी वंदे मातरम् पूर्ण म्हणता आले तर सभा दोन महिने तहकूब करा’; विरोधी नगरसेवकांचा सत्ताधारी भाजपाला टोला

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि ज्वलंत प्रश्न चर्चेसाठी असताना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् म्हणण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपानेच गोंधळ घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. या गोंधळामुळे सर्वसाधारण सभा अखेर १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे, सभागृहात गोंधळ सुरू असताना महापौर रवि लांडगे यांचा मूड मात्र सभा तहकूब करण्याच्या बाजूने दिसत नव्हता, तर सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे हे सभा तहकूब करण्यासाठी घाई करताना दिसले, अशी चर्चा सभागृहात रंगली.

वंदे मातरम् म्हणण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेवर आक्षेप घेत, “यातील एकाला जरी वंदे मातरम् पूर्ण म्हणता आले, तर सभा दोन महिने तहकूब करा,” असा खोचक टोला लगावला.

शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विश्वजीत बारणे यांनीही सभागृहातील या घडामोडींवर भूमिका मांडत सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

शहराचे प्रश्न बाजूला; वंदे मातरम् वरून गोंधळ

पिंपरी-चिंचवड शहरात विविध नागरी प्रश्न गंभीर बनलेले असताना त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणे अपेक्षित होते. पाणीपुरवठा, वाहतूक, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, अनधिकृत बांधकामे तसेच नागरिकांशी संबंधित विविध प्रश्न सभेच्या अजेंड्यावर असताना वंदे मातरम् म्हणण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला.

विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपानेच गोंधळ घालत सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी अशा मुद्द्यावरून सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर का आली, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला.

महापौरांचा वेगळा मूड; सत्तारूढ पक्षनेते सभा तहकुबीसाठी आग्रही?

सभागृहातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांची भूमिका आणि सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांची भूमिका यामध्ये काहीसा फरक दिसून आल्याची चर्चा रंगली. महापौरांचा मूड सभा लगेच तहकूब करण्याचा नसल्याचे जाणवत असतानाच प्रशांत शितोळे मात्र सभा तहकूब करण्यासाठी घाई करताना दिसले.

अखेर महापौर रवि लांडगे यांनी सर्वसाधारण सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात महापौर आणि सत्तारूढ पक्षनेते यांच्यातील समन्वयाबाबतही चर्चेला उधाण आले आहे.

‘शहरवासीयांची किती काळजी?’

शहरातील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना सर्वसाधारण सभा ही त्यावर चर्चा करून निर्णय घेण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मात्र, वंदे मातरम् या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षानेच गोंधळ घालत सभा तहकूब केल्याने शहरवासीयांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय मुद्द्यांना प्राधान्य दिले जात आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिका सभेत स्वतः गोंधळ निर्माण करायचा आणि त्यानंतर सभा तहकूब करायची, या प्रकारामुळे सत्ताधारी भाजपाला शहरातील ज्वलंत प्रश्नांची किती काळजी आहे, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका विरोधी नगरसेवकांकडून करण्यात आली.

वंदे मातरम् सारख्या संवेदनशील आणि राष्ट्रभावनेशी निगडित विषयावरून राजकीय श्रेय घेण्याच्या प्रयत्नात शहराच्या मूलभूत प्रश्नांवरील चर्चा मात्र लांबणीवर पडली. त्यामुळे १७ सप्टेंबरला होणाऱ्या पुढील सर्वसाधारण सभेत शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सत्ताधारी पक्ष काय भूमिका घेतो, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments