आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या सूचना
शहरातील विविध भागांमधील नालेसफाईचे काम २० मे पुर्वी पुर्ण करावे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना नालेसफाईच्या कामामध्ये कोणताही अडथळा आल्यास याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून प्रश्न सोडवावेत. ज्या ठिकाणी जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने नालेसफाई करणे शक्य नाही किंवा अरुंद नाल्यांच्या ठिकाणी सुरक्षा साधने वापरूनच नालेसफाई करावी. तसेच सफाई पुर्वीची आणि सफाई नंतरची छायाचित्रे काढवीत आणि साफसफाईचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करावा. बुजविलेले नाले, नाल्यावरती किंवा नाल्यामध्ये केलेले अतिक्रमण आणि नाल्याची रुंदी कमी केलेली आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाळ्यास सुरूवात होते. पावसाळा सुरू झाल्यास नालेसफाईचे काम करण्यास अडचणी येतात, त्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या आधी सर्व नाल्यांची साफसफाई होणे गरजेचे आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयातंर्गत लहान-मोठे सुमारे १४८ नाले साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील बोलत होते.
या बैठकीस उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, डॉ. अंकुश जाधव, सिताराम बहुरे, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, सतीश वाघमारे, विजय वाईकर, गणेश देशपांडे, अनिल शिंदे, देवन्ना गट्टूवार, सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे, मगेश आढाव, अंकुश झिटे, दरवडे के.डी, राजेश भाट, मुख्य आरोग्य निरीक्षक सतिश पाटील, तानाजी दाते तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
ज्या नाल्यांमध्ये साफसफाई करताना अडचणी येत आहेत त्या नाल्यांची संबंधितांनी प्रत्यक्ष पाहणी करावी आणि येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढावा. दररोज होणाऱ्या नाले सफसफाईच्या कामाचे अपडेट्स आरोग्य विभागाला द्यावेत. सखल भागातील नाल्यांची योग्यरित्या साफसफाई करून तेथील मोठी गटारे, छोटे नाले यातील पुर्ण गाळ काढावा जेणेकरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या.
तसेच यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नाल्यांची लांबी, नाल्यांचे ठिकाण (कोठून कोठपर्यंत), नाल्यांची रूंदी, कामकाज सुरू केलेला दिनांक, कामाची टक्केवारी, नाले साफसफाई कामाची प्रगती इ. बाबींची सविस्तर माहिती घेतली.