Tuesday, April 21, 2026
Homeअर्थविश्वपिंपरी-चिंचवडच्या अस्मितेवर आयुक्तांचे घाव; "महापालिकेला जगात कोणी ओळखत नाही" या विधानामुळे शहरवासीयांच्या...

पिंपरी-चिंचवडच्या अस्मितेवर आयुक्तांचे घाव; “महापालिकेला जगात कोणी ओळखत नाही” या विधानामुळे शहरवासीयांच्या भावना दुखावल्या.. 

एकीकडे पिंपरी-चिंचवड शहर हे आशियातील सर्वात प्रगत औद्योगिक केंद्र आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून जागतिक नकाशावर झळकत असताना, दुसरीकडे शहराच्याच प्रशासकीय प्रमुखांनी शहराच्या अस्मितेचा अपमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. “अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला जगात कोणी ओळखत नाही,” असे खळबळजनक विधान आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी घटना काय?

जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गांधर्व मंच या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेच्या’ निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त बोलत होते. ही स्पर्धा २ एप्रिल ते ७ जून या कालावधीत संतपीठ परिसरात पार पडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जयंती वर्ष आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा, तसेच गांधर्व महाविद्यालयाचे १२५ वे वर्ष अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मंगलमय वातावरणात आयुक्तांच्या एका विधानाने मिठाचा खडा टाकला आहे.

शहराच्या जागतिक प्रतिमेवर प्रश्नचिन्ह..

पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्तांनी गांधर्व महाविद्यालयाच्या जागतिक वारशाचे गुणगान गाताना थेट पिंपरी-चिंचवड शहराच्या अस्तित्वावरच घाला घातला. “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला जगात कोणी ओळखत नाही,” असे विधान त्यांनी केले. ज्या शहरात जगातील नामांकित ऑटोमोबाईल आणि आयटी कंपन्यांचे जाळे पसरलेले आहे, ज्या शहराने देशाला सर्वाधिक महसूल मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे, त्या शहराबद्दल खुद्द आयुक्तांनीच असे नकारात्मक उद्गार काढल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

“आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधांचा दावा करतो, आमचे शहर ‘इंडस्ट्रियल हब’ आहे, मग अशा वेळी शहराच्या प्रशासकीय प्रमुखांनीच शहराला ‘अनोळखी’ म्हणणे, हा शहरवासीयांचा आणि इथल्या कष्टाळू कामगारांचा अपमान आहे.” – अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी: संवादाचा अभाव की जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

या महत्त्वाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर आणि शिक्षण समिती सभापती यांची अनुपस्थिती सर्वांच्या नजरेत भरली. यामुळे राजकीय वर्तुळात प्रश्न चर्चिले जात आहेत, प्रशासनाने इतक्या मोठ्या कार्यक्रमाची माहिती लोकप्रतिनिधींना दिली होती की नाही..? 

पत्रकारांनी घेतला आक्षेप….

आयुक्तांच्या विधानानंतर पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पत्रकारांनी तत्काळ आक्षेप घेतला. शहराची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडणे चुकीचे असल्याचे त्यांनी आयुक्तांना सुनावले. या घटनेचे पडसाद सोशल मीडियावरही उमटत असून, नेटकऱ्यांनी “आयुक्त महोदय, थोडा शहराचा इतिहास अभ्यासा,” अशा शब्दांत टोले लगावले आहेत.

महत्त्वाचे मुद्दे:

• आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धा: २ एप्रिल ते ७ जून दरम्यान आयोजन.

• ठिकाण: संत तुकाराम महाराज संतपीठ, पिंपरी-चिंचवड.

• वादाचे केंद्र: आयुक्तांनी शहराच्या जागतिक ओळखीबाबत केलेले विधान.

• लोकांची भावना: शहराच्या अस्मितेशी खेळ केल्याची भावना.

राजकीय वर्तुळात पडसाद उमटण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवडच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आता राजकीय वर्तुळातूनही आयुक्तांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला जाण्याची शक्यता आहे. एका बाजूला आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेच्या निमित्ताने शहराचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे आयुक्तांच्या या विधानामुळे शहराची विषयीची नकारात्मक भावना असल्याची चर्चा आता संपूर्ण शहरात रंगली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments