Saturday, December 9, 2023
Homeगुन्हेगारीअनाधिकृत जाहिरात फलक आढळल्यास परवाना निरीक्षकांवर फौजदारी कारवाई, आयुक्तांचा इशारा

अनाधिकृत जाहिरात फलक आढळल्यास परवाना निरीक्षकांवर फौजदारी कारवाई, आयुक्तांचा इशारा

महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या परवाना निरीक्षकांनी २८ एप्रिलपर्यंत शहरातील सर्व लोखंडी जाहिरात फलकांचे (होर्डिंग) सर्वेक्षण करून छायाचित्रांसह अहवाल सादर करावा. शुक्रवारनंतर शहरात बेकायदा फलक आढळल्यास शिस्तभंगासह, फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी परवाना निरीक्षकांना दिला आहे.

किवळेतील फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या ४३४ बेकायदा फलकांव्यतिरिक्त ७२ नव्याने बेकायदा फलक आढळून आले आहेत. यापैकी ६५ फलक काढले आहेत. न्यायप्रविष्ठ फलकांव्यतिरिक्त बेकायदा फलक शहरात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आल्यानंतर भविष्यात दुर्घटना घडू नये, यासाठी आयुक्त सिंह यांनी आकाश चिन्ह विभागाच्या परवाना निरीक्षकांना शहरातील सर्व फलकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. २५ ते २८ एप्रिल दरम्यान हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे.

सर्वेक्षण करताना फलकांची संख्या, स्थळ, मंजूर मोजमाप आणि प्रत्यक्ष असणारे मोजमाप याचा स्वतंत्र स्वाक्षांकित अहवाल निरीक्षकांनी छायाचित्रांसह तयार करावा. या अहवालानंतर आयुक्त सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, विभागप्रमुख नीलेश देशमुख सर्व फलकांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करणार आहेत. या तपासणीमध्ये निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालातील मोजमापामध्ये व प्रत्यक्ष तपासणीतील मोजमापामध्ये तफावत आढळून आली. तसेच बेकायदा फलक आढळल्यास पालिकेची दिशाभूल केल्याचा ठपका निरीक्षकांवर ठेवण्यात येणार आहे. निरीक्षकांवर शिस्तभंगासह, फौजदारी स्वरूपाची कडक कारवाई करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments