महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांची बदली; तीन वर्षे दोन महिन्यांच्या सरासरी कारकीर्दीनंतर नाशिककडे बदली
पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात आली असून त्यांना नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासनादेश महापालिकेला प्राप्त झाला आहे.
शेखर सिंह यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनिक सुधारणा, विकासकामांना गती आणि नागरिकाभिमुख उपक्रम सुरू करण्यात आले असले तरी, त्यांच्या कारकीर्दीवर अनेक वादांचे सावट राहिले.
महानगरपालिकेतील ठेकेदारी कामांपासून ते भूविकास प्रकल्पांपर्यंत विविध निर्णयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. काही निविदा प्रक्रियांतील अनियमितता आणि ठराविक गटांना लाभ मिळवून दिल्याच्या तक्रारी वारंवार पुढे आल्या. आयुक्तपदावर असताना त्यांनी काही वेळा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी तणाव निर्माण होईल असे निर्णय घेतल्याचेही बोलले जाते.
राजकीय वर्तुळात शेखर सिंह यांचा भाजपाशी झुकाव असल्याच्या चर्चा वारंवार रंगल्या. नगरसेवकांच्या बैठकीत व जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली भूमिका अनेकदा विवादास्पद ठरली. विरोधकांनी त्यांच्यावर पक्षपाती वर्तनाचे आरोप केले, तर सत्ताधारी गटाने मात्र त्यांच्या कार्यशैलीचे समर्थन केले.
दरम्यान, त्यांच्या बदलीनंतर आयुक्त पदाचा तात्पुरता कार्यभार पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हर्डीकर हे पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त जबाबदारी सांभाळणार आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही बदली राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.


