Sunday, July 20, 2025
Homeताजी बातमीअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह तसेच महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली विविध स्थळांची...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह तसेच महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली विविध स्थळांची पाहणी..

अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून माहिती घेतली आणि नागरिकांशी संवाद साधला. तसेच संबंधित विभागप्रमुख अधिकारी यांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देवून पुरसदृश्य भागातील तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

अतिवृष्टीमुळे व धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरातील नदीकाठच्या भागांची तसेच सखल भागांची पाहणी केली. त्यामध्ये मुख्यत्वे मोशी स्मशानघाट, सांगवी येथील मधुबन सोसायटी, अभिनवनगर, बोपखेल येथील काही परिसर, विविध ठिकाणची निवारा केंद्रे, चिखली येथील मोई फाटा, डिफेन्स कॉलनी, सांगवी येथील दशक्रिया घाट, इंदिरानगर, पिंपरी येथील झुलेलाल घाट, फुगेवाडी येथील जय भारत नगर आदी ठिकाणांचा समावेश होता.

मोशी येथील स्मशानघाटात इंद्रायणी नदीचे पाणी शिरले आहे. या ठिकाणी उप आयुक्त रविकीरण घोडके वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार व पथकाने भेट देवून पाहणी केली तसेच परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याबाबत आवाहन केले.

सांगवी येथील मधुबन सोसायटी येथे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सोसायटीमधील रहिवाशांशी संवाद साधला तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत आणि आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.

अभिनवनगर सांगवी येथे आयुक्त शेखर सिंह यांच्यासमवेत क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल यांनी नागरिकांसमवेत संवाद साधला. तसेच आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबाची काळजी घेण्याबाबत आणि परिसरातील नागरिकांनी निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित होण्यासाठी महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेस संपर्क साधून एकमेकांस सहकार्य करण्याबाबत आवाहन केले.

बोपखेल येथे उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्यासमवेत पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी पुरसदृश्य भागांची पाहणी केली तसेच तेथील नागरिकांसमवेत चर्चा करून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत आवाहन केले.

सध्या इंद्रायणी नदीची पाणी पातळी कमी आहे. तरी नागरिकांनी सतर्क रहावे आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेस संपर्क साधावा, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी डिफेन्स कॉलनी, दशक्रिया घाट सांगवी येथील इंद्रप्रस्थ सोसायटी येथे पाहणीदरम्यान नागरिकांशी बोलताना दिल्या. यावेळी चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंके यांनीही नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर आयुक्त सिंह यांनी अहिल्यादेवी होळकर शाळा, सांगवी येथील निवारा केंद्रास भेट देऊन महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली.

इंदिरानगर, पिंपरी येथील झुलेलाल घाट, फुगेवाडी येथील जय भारत नगर येथे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्यासमवेत सहाय्यक आयुक्त शितल वाकडे, उमेश ढाकणे यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी खोराटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सोयीसाठी योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या.

चिखली येथील मोई फाटा, रिव्हर रेसिडेन्सी येथे विधानसभा आमदार महेश लांडगे यांच्यासमवेत आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सखल भागांची पाहणी केली. यावेळी आमदार महेशदादा लांडगे यांनी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे – आमदार महेश लांडगे

शहरात सातत्याने पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार महेशदादा लांडगे यांनी केल्या. तसेच महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपत्कालीन यंत्रणा दक्ष ठेवून नागरिकांना सर्वोतोपरी मदत करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. तसेच अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचेही महेश लांडगे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments