Friday, September 11, 2026
Homeआरोग्यविषयकनागरिकांच्या तक्रारींची आयुक्तांकडून थेट दखल; संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

नागरिकांच्या तक्रारींची आयुक्तांकडून थेट दखल; संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

नागरिकांच्य समस्या संवेदनशीलतेने ऐकून कालबद्ध निपटारा करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या विविध तक्रारी व निवेदनांची प्रत्यक्ष दखल घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून त्यांचा कालबद्ध आणि प्रभावी निपटारा करण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित अभ्यागत भेटीदरम्यान नागरिकांनी विविध समस्या आणि तक्रारी आयुक्तांसमोर मांडल्या. यामध्ये अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची दुरुस्ती, अतिक्रमण, स्मशानभूमी, क्रीडा सुविधा, शिक्षण, स्थापत्य विषयक कामे, आरोग्य सेवा, वैद्यकीय सुविधा, मालमत्ता कर, विविध विकासकामे, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच नागरिकाभिमुख योजनांशी संबंधित निवेदनांचा समावेश होता.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी प्रत्येक तक्रार व निवेदन बारकाईने ऐकून घेत संबंधित विभागप्रमुखांकडून प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेतली. तक्रारींचे स्वरूप, त्यातील अडचणी आणि उपलब्ध उपाययोजनांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

काही प्रकरणांमध्ये एकापेक्षा अधिक विभागांचा समन्वय आवश्यक असल्यास संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

“महापालिका प्रशासनाचा केंद्रबिंदू नागरिक आहे. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारीकडे संवेदनशीलतेने पाहून तिचा कालबद्ध आणि प्रभावी निपटारा करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि तत्पर सेवा उपलब्ध करून द्यावी,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

दर गुरुवारी नागरिकांसाठी थेट भेटीची वेळ

नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर गुरुवारी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत अभ्यागतांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी वेळ राखून ठेवला आहे. या वेळेत नागरिक आपल्या तक्रारी, सूचना, अडचणी तसेच विविध विषयांवरील निवेदने थेट आयुक्तांकडे सादर करू शकतात.

या उपक्रमांतर्गत नागरिकांकडून प्राप्त निवेदनांवर संबंधित विभागप्रमुखांकडून माहिती घेऊन आयुक्तांकडून आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा आणि त्यांचा निपटारा अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments