Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमीराज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद,उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद,उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

करोना, विशेषत: ओमायक्रॉन उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच स्वयंअर्थसहित, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. या काळात वर्ग आणि परीक्षा फक्त ऑनलाइन पद्धतीने सुरू राहतील.

महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्केच राहील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. करोनाचा उद्रेक आणि विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील परीक्षांबाबतही चार दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून जनतेश संवाद साधताना स्पष्ट केले.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळांपाठोपाठ महाविद्यालये बंद करण्याबाबत मंगळवारी कुलगुरू व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केल्यावर सामंत यांनी निर्णय जाहीर केला. विद्यार्थी हा केंद्रिबदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या आहेत. हा पूर्वानुभव लक्षात घेता विजेची अनुपलब्धता किंवा इंटरनेट जोडणी नसल्यामुळे अथवा स्वत: विद्यार्थी किंवा कुटुंबीय करोनाबाधित असल्यास संबंधित विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी. तसेच गोंडवाना विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ व नांदेड विद्यापीठाशी संलग्नित काही भागात नेट विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन लेखी स्वरूपात या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयाशी संबंधित वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना व कालावधी देऊन ही वसतिगृहे बंद करावीत. मात्र, परदेशी विद्यार्थी व संशोधन करीत असलेले पीएचडीचे विद्यार्थी यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यात यावी. या विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याबाबत विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. स्थानिक प्राधिकरणास करोना काळजी केंद्रासाठी आवश्यकता असल्यास वसतिगृह उपलब्ध करून देण्यात यावीत, अशा सूचनाही सामंत यांनी यावेळी केल्या. विद्यापीठे तसेच महाविद्यालयांनी अद्याप लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणांना देऊन लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून तातडीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे. तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी १५ ते १८ या वयोगटातील असल्याने विशेष मोहिमेद्वारे त्यांचेही लसीकरण करून घ्यावे. तसेच १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी चित्रकला परीक्षा ऑनलाइन पद्धतीने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात घेण्याचे आदेश कला संचालकांना देण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची चक्राकार पद्धतीने ५० टक्के उपस्थितीचे नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयाने हेल्पलाइन व्यवस्था सुरू करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत़. परीक्षेची कार्यपद्धती, परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच आदींची माहिती विद्यापीठांनी आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली़.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments