साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, थेरगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध ९ भाषांमधील ५५१ पुस्तकांचा ऐतिहासिक संग्रह जतन केला आहे. त्यांच्या या विक्रमी संग्रहाची राष्ट्रीय स्तरावर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
संभाजी बारणे यांनी जमा केलेल्या या संग्रहात प्रामुख्याने मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलगू, गुजराती आणि सिंधी अशा नऊ भाषांतील पुस्तकांचा समावेश आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या समितीच्या वतीने दि. २५ मार्च २०२६ रोजी त्यांना अधिकृत प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिवचरित्रावर अशा प्रकारचा बहुभाषिक संग्रह करणारे बारणे हे एकमेव असल्याचे बोलले जात आहे.
मूर्ती आणि नाण्यांचाही खजिना
केवळ पुस्तकेच नव्हे, तर बारणे यांच्याकडे शिवरायांच्या विविध धातूंमधील आणि आकारांतील ७० हून अधिक मूर्ती आहेत. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ काढलेल्या दोन रुपयांच्या सुमारे १५०० नाण्यांचा संग्रहही त्यांनी केला आहे. हा ऐतिहासिक ठेवा नागरिकांना पाहण्यासाठी थेरगाव येथील त्यांच्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे.
संशोधकांसाठी मोफत संदर्भ सेवा
शिवचरित्रावर सखोल संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठी ही ५५१ पुस्तके संदर्भ म्हणून मोफत उपलब्ध असतील, असे बारणे यांनी जाहीर केले आहे. थेरगाव गावठाण येथे लोकवर्गणीतून महाराजांचा अर्धपुतळा उभारण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
यापूर्वीही जागतिक विक्रमात स्थान
संभाजी बारणे यांचा हा पहिलाच विक्रम नाही. यापूर्वी त्यांनी १९७८ ते २०२२ या काळातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२०० आजी-माजी नगरसेवकांच्या व्हिजिटिंग कार्डचा संग्रह केला होता. त्याची नोंद २०१९ मध्येच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व :
शेती आणि बांधकाम व्यवसायात सक्रिय असणारे बारणे हे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीव सभासद आहेत. नुकतेच त्यांच्या ‘पिंपरी चिंचवड वैभव’ या कविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते पार पडले. त्यांच्या या नव्या विक्रमाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


