Tuesday, March 18, 2025
Homeआरोग्यविषयकपुणे राज्यात सर्वांत थंड; किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस

पुणे राज्यात सर्वांत थंड; किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस

कोरड्या हवामानामुळे राज्यासह पुण्यातील रात्रीच्या किमान तापमानात गेल्या तीन दिवसांपासून झपाट्याने घट झाली असून, गुरुवारी पुणे शहरातील तापमान राज्यात सर्वांत कमी तापमान ठरले. किमान तापमानाचा पारा १०.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने शहरात गुरुवारी थंडीचा कडाका वाढला होता. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार शनिवारपासून शहरात पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे.

शहरात नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून अंशत: ढगाळ वातावरण होते. दिवाळीच्या कालावधीत पावसानेही हजेरी लावली. त्यानंतरही दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती राहिल्याने रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाल्यापासून किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली होती. ७ नोव्हेंबरला शहरात किमान तापमान २० अंशांच्याही पुढे होते. ८ नोव्हेंबरला त्यात एकदमच घट होऊन ते १५.८ अंशांपर्यंत आले. ९ नोव्हेंबरला १२.७, तर १० नोव्हेंबरला किमान तापमानाचा पारा ११.८ अंशांपर्यंत खाली आला. त्यामुळे हवेतील गारवा वाढला होता. ११ नोव्हेंबरला त्यात आणखी घट होऊन किमान तापमान १०.९ अंशांपर्यंत खाली आले. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ४.८ अंशांनी कमी होते. त्यामुळे ते राज्यातील सर्वांत कमी तापमान ठरले. दिवसाचे कमाल तापमान मात्र सरासरीप्रमाणे ३१.१ अंशांवर होते.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आणखी एक दिवस शहरात कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे. त्यानंतर मात्र पुन्हा पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. १३ ते १६ या कालावधीत शहर आणि परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. याच दरम्यान पुणे परिसरात काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

हवेली, शिरूर आणखी थंड

पुणे शहरातील शिवाजीनगर केंद्रात गुरुवारी १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. मात्र, हवेली आणि शिरूर तालुक्यात त्याहून कमी प्रत्येकी ९.७ अंश किमान तापमान नोंदविले गेले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरातही १० अंशांखाली म्हणजे ९.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली. वडगावशेरी, जुन्नर, चिंचवड, मगरपट्टा, लवळे आदी भागांत मात्र १७ ते १८ अंश किमान तापमान नोंदविले गेले. त्यामुळे या भागांत थंडीचा कडाका कमी होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments