सव्वातीन महिन्यांत ६ रुपयांनी सीएनजी महाग
पेट्रोल, डिझेल पाठोपाठ नागरिकांना सीएनजीच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. गेल्या सव्वातीन महिन्यांत पुण्यात सीएनजीचा दर साडेसहा रुपयांनी वाढला आहे. गुरुवारपासून लागू झालेल्या दरवाढीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीएनजीचा दर ६६ रुपयांवर गेला आहे.
सीएनजी, पीएनजी निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या (नैसर्गिक वायू) दरात वाढ झाली. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) पुण्यात सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ केली आहे. नुकताच सीएनजीचा दर दोन रुपये दहा पैशांनी वाढवला आहे. त्यामुळे दर ६६ रुपयांवर गेला आहे, तर घरगुती वापराचा गॅस आता ३६ रुपये किलो झाला आहे, अशी माहिती ‘एमएनजीएल’ने दिली.
चार वर्षांत १८ रुपयांची वाढ
पुण्यात जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२२ या कालावधीत सीएनजी सुमारे १८ रुपयांनी महागला आहे. एक जानेवारी २०१८ रोजी सीएनजीचा दर ४७.५० रुपये होता. तो दर आता ६६ रुपयांवर आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर आर्थिक भार वाढला आहे.
सीएनजी दरवाढीचा आढावा (प्रतिकिलोचा दर रुपयांत)
दरवाढीचा दिनांक कितीने वाढला अंतिम दर
४ ऑक्टोबर २ रुपये ५९.४०
१४ ऑक्टोबर २.६० रुपये ६२.००
१८ नोव्हेंबर १.९० रुपये ६३.९०
१२ जानेवारी २.१० रुपये ६६.००
आकडे बोलतात…
१,७६,५०० पुण्यातील ‘सीएनजी’वरील वाहन संख्या,
१,०६,५००पिंपरी-चिंचवडमधील सीएनजी वाहन संख्या
१०८ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सीएनजी पंप


