राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहा-सात महिन्यांनी मराठी चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानाच्या रांगेमध्ये प्रतीक्षेत असलेल्या २०४ मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे आणि श्रीरंग देशमुख यांचा समावेश आहे. यासंदर्भात बुधवारी (२५ जानेवारी) शासकीय अध्यादेश जारी करण्यात आला. ही समिती अस्तित्वात आल्यामुळे अनुदान मिळण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या २०४ चित्रपट निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर चित्रपट अनुदान समिती स्थापन करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. सरकार अस्तित्वात आल्यानंतर वर्षभराने समिती स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांनी केली. मात्र, करोना निर्बंधांमुळे दोन वर्षे या समितीला कामकाज करण्याची संधी मिळाली नाही. समितीचे काम सुरू होइपर्यंत राज्यात सत्ताबदल झाल्याने समितीचे अस्तित्व संपुष्टात आले होते.