Wednesday, November 11, 2026
Homeक्रिडाविश्वअविनाश-विश्वजीत यांच्या सुरेल मैफिलीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाची सांगता..!

अविनाश-विश्वजीत यांच्या सुरेल मैफिलीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाची सांगता..!

‘मोगरा फुलला’, ‘ओल्या सांजवेळी’सह लोकप्रिय मराठी गीतांनी रसिक मंत्रमुग्ध; संगीत, साहित्य आणि काव्याचा सुरेल संगम

मराठी गीतांचा गोडवा, सुरांची मोहकता आणि भावनांचा हळुवार आविष्कार अनुभवत रसिक प्रेक्षक संगीताच्या अलवार लहरींवर डोलले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा समारोप चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अविनाश-विश्वजीत यांच्या सुरेल संगीत मैफिलीने झाला. लोकप्रिय मराठी गीतांच्या सादरीकरणाने रंगलेल्या या मैफिलीने रसिकांना स्वरानंदाची अविस्मरणीय अनुभूती दिली.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा सांगता सोहळा संगीताच्या सुरेल मैफिलीने झाला.

मैफिलीची सुरुवात ‘मोगरा फुलला’ या गीताने झाली. त्यानंतर ‘का कळेना’, ‘कधी तू’, ‘भेटला विठ्ठल’ आणि ‘फूलवंती’ या गीतांनी वातावरणात रंगत आणली. ‘केव्हा तरी पहाटे’ आणि ‘ओल्या सांजवेळी’ या गीतांच्या सादरीकरणातून प्रेमभावना आणि विरहाच्या हळुवार छटा उलगडल्या. गीतांचे अर्थपूर्ण शब्द, गायकांची भावस्पर्शी अभिव्यक्ती आणि संगीताची सुरेल साथ यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.

‘फॅन्टॅस्टिक’, ‘मदनमंजिरी’, ‘साथ दे’, ‘तुला पाहता’ आणि ‘आदी तूच अंती तूच’ या गीतांनी मैफिलीची रंगत आणखी वाढवली. प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. प्रेम, भक्तिभाव, आनंद आणि चैतन्य अशा विविध भावछटांनी सजलेल्या गीतांनी प्रेक्षागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

मध्यंतरानंतरही मैफिलीचा उत्साह कायम राहिला. ‘आली ठुमकत नार छौ’, ‘अविनाश इन्स्ट्रुमेंटल’ आणि ‘कुसुमाग्रज… कविता… विश्वजीत’ या सादरीकरणांतून संगीत, साहित्य आणि काव्य यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. विशेषतः कुसुमाग्रजांच्या कवितेच्या सादरीकरणाने मराठी भाषेतील शब्दसामर्थ्य, साहित्यिक समृद्धी आणि भावसौंदर्याचा प्रत्यय रसिकांना दिला.

‘हृदयात वाजे समथिंग’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि ‘असा हा धर्मवीर ट्रॅक’ या गीतांनी मैफिलीला भावनिक आणि ऊर्जावान वळण दिले. त्यानंतर ‘हंबीर तू’ या गीताने मैफिलीतील उत्साह अधिकच वाढवला. सुरेल गायन, प्रभावी संगीत आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

मराठी भाषेचा गोडवा केवळ शब्दांतच नव्हे, तर संगीत, कविता आणि भावभावनांच्या अभिव्यक्तीतही सामावलेला आहे, याची प्रचिती या मैफिलीतून आली. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला संगीताची सुरेल किनार लाभली आणि रसिकांच्या मनात मराठी गीतांचा अविस्मरणीय ठेवा निर्माण झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments