Tuesday, October 13, 2026
Homeक्रिडाविश्वज्ञानेश्वरीपासून शिवरायांपर्यंत मराठीचा अभिजात वारसा - पं. हृदयनाथ मंगेशकर

ज्ञानेश्वरीपासून शिवरायांपर्यंत मराठीचा अभिजात वारसा – पं. हृदयनाथ मंगेशकर

अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा मानपत्र देऊन सन्मान

पिंपरी, दि. ३ ऑक्टोबर २०२६ : “ज्या मराठी भाषेत ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे होऊन गेले, त्या भाषेला अभिजाततेचा वेगळा दर्जा देण्याची गरजच नाही. मराठी भाषा मुळातच अभिजात आहे,” असे प्रतिपादन पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या उद्घाटनप्रसंगी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “अभिजात मराठी भाषेतील अभिजात काव्याला स्वरबद्ध करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. मला जेव्हा अभिजात काव्य सापडत गेले, तेव्हा त्याला चाली देत गेलो. कविता मला अंतर्मुख करते. माझ्या बालपणी आईकडून ऐकलेल्या गोष्टी आणि नंतर तिने वाचून दाखवलेल्या पुस्तकांमधून भाषेचे सौंदर्य माझ्या मनावर संस्कार करत गेले. माझ्या हातात आलेले पहिले पुस्तक हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाटक होते. त्या काळात कानावर पडणाऱ्या भाषेच्या सौंदर्याने मनावर खोल संस्कार झाले.”

“स्वरांची माऊली आहे, शब्दांची माऊली आहे आणि भाषेचीही एक माऊली आहे. ज्ञानेश्वरांना लोक ‘माऊली’ म्हणू लागले, कारण ते ज्या भाषेला टेकून बसले होते, त्या भाषेने असंख्य लोकांना ज्ञान आणि भावविश्व दिले. माझी मोठी बहीण स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आशीर्वादाचा आणि संस्कारांचा माझ्या संगीतसाधनेत मोठा वाटा आहे. माझी मोठी बहीण शारदा विश्वमोहिनी होती. मंगेशकर कुटुंबातून मिळालेला सांगीतिक वारसा माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे,” असेही त्यांनी सांगितले.

“अभिजात मराठी भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. या सन्मानाबद्दल मी महानगरपालिकेचा मनःपूर्वक आभारी आहे,” अशी भावना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.

अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले, “पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महान कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला लाभले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या कर्तृत्वाची आणि संगीतसाधनेची व्याप्ती शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला, तरी आमच्या शब्दांना एक किनारा आहे; मात्र आपल्या शब्दांना आणि संगीताला कोणताही किनारा नाही. आपण स्वतः एक अथांग समुद्र आहात.”

विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे ही अभिमानाची बाब आहे. या अभिजातत्वाचा गौरव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो दैनंदिन व्यवहारात आणि पुढील पिढ्यांच्या संस्कारांमध्ये दिसला पाहिजे. याच भावनेतून ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि ३ ते ९ ऑक्टोबर हा कालावधी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा केला जात आहे.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतकारकीर्दीचा गौरव करताना गायकवाड म्हणाले, “मंगेशकर कुटुंबाने भारतीय संगीतविश्वाला अनमोल स्वर दिले. या महान परंपरेतून आलेल्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वतंत्र प्रतिभा, प्रयोगशील संगीतदृष्टी आणि सखोल संगीतसाधनेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक, लोकसंगीताची मातीशी जोडलेली सहजता, पाश्चात्त्य संगीताची प्रयोगशीलता आणि मराठी शब्दांविषयीची विलक्षण संवेदनशीलता दिसून येते.”

यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी छायाचित्र प्रदर्शनाविषयी माहिती दिली. पत्रकारितेत वृत्त छायाचित्रकारांची भूमिका महत्त्वाची असून, अनेकदा एक छायाचित्र संपूर्ण बातमी सांगून जाते, असे त्यांनी नमूद केले.

‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या कलादालनात हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन राजेंद्र पाटील यांनी केले.

याप्रसंगी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रविंद्र, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रतिनिधी तुषार झरेकर, किशोर बरकुले तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मानपत्राचे वाचन किरण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments