३ एप्रिल २०२१, ( फोटो ;-सचिन फुलसुंदर )
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु, करोना आटोक्यात येत नसल्याने पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिनी लॉकडाउनबाबत निर्णय घेतला. त्यानुसार, आजपासून पिंपरी-चिंचवड शहरात सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ( शनिवार दि ३ एप्रिल ) आजपासून अशंतः लॉकडाउनला सुरूवात झाली असून, नागरिक आणि व्यापारी वर्गातून या अशंतः लॉकडाउनला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. पहिल्याच दिवशी बरोबर सायंकाळी सहा वाजता शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरीला पाहिलं जातं त्या ठिकाणी देखील वेळेत दुकाने बंद करून प्रशासनाला सहकार्य करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.तसेच चिंचवड आकुर्डी आणि पिंपरी चिंचवड मधील इतर परिसरात व्यापाऱ्यांनी हि वेळेत दुकाने बंद करून प्रशासनाला सहकार्य केले
तर, आज अनेक ठिकाणी नागरिकांची थोडी धावपळ झाल्याचे देखील पाहायला मिळाले. याशिवाय अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील दिसून आली . नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सात दिवस या अशंतः लॉकडाउनला प्रतिसाद दिल्यास करोना साखळी तोडण्यात यशस्वी होऊ असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी म्हटले आहे. तसेच, नागरिकांनी इथून पुढेही असाच प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.