पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर बनविण्यासाठी लोकसहभागदेखील महत्वपूर्ण आहे. येणा-या पिढ्यांना शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी प्रत्येकाने विचार करणे गरजेचे असून स्वच्छतेची लोकचळवळ व्यापक करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्लॅगोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृती करीता प्लॅगोथॉन मोहिम येत्या दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन आज चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृह येथे आयोजित केली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त राजेश पाटील बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उप आयुक्त संदीप खोत, आशादेवी दुरगुडे, क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, सोनम देशमुख, महापालिकेचे सर्व सहाय्यक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, गणेश मंडळे, एजी-बीव्हीजी संस्था, ठेकेदार, एजन्सी, गृहनिर्माण संस्था, हॉटेल असोसिएशन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात असून यात लोकसहभाग वाढावा यासाठी शहरातील ३२ प्रभागातील ६४ ठिकाणी प्लॅगोथॉनचा उपक्रम राबविला जाणार आहे. हा उपक्रम राबवताना क्षेत्रिय कार्यालय स्तरावर बारकाईने नियोजन करणे, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांचा सहभाग वाढवणे, प्रतिष्ठीत नागरिकांना या मोहिमेत सहभागी करुन घेण्यासाठी नियोजन सुरु आहे असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. स्वच्छतेबद्द्ल जागरुकता आणि अभिमानाची भावना प्रत्येकात रुजणे आवश्यक आहे. कच-याचे विलगीकरण आणि विल्हेवाट याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी महापालिका जागृती करुन महत्व पटवून देत आहे. वेळेत कचरा संकलनाचे नियोजन व आराखडा महापालिकेने तयार केला आहे. कच-याची विल्हेवाट लावत असताना त्यापासून खत अथवा विविध वस्तूंची निर्मिती केल्यास कचरा कमी होऊ शकतो. यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करण्याचे काम सुरु आहे. आपले शहर वेगाने वाढत्या नागरिकरणाकडे वाटचाल करीत असून त्या वेगाला धरुन जनजीवन आणि सुविधांचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले. कचरा मुक्ती म्हणजे स्वच्छता आणि स्वच्छता म्हणजे आरोग्य ही साखळी लक्षात घेऊन प्लॅगोथॉन मोहिमेला यशस्वी करण्यासाठी एकजूटीने सर्वांनी सहभागी व्हावे, पर्यावरण संवर्धनाला आपला हातभार लावावा असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
आयुक्त पाटील यांनी उपस्थित प्रतिनिधींसमवेत संवाद साधला. काही प्रतिनिधींनी त्यांच्या सूचना मांडल्या असे आयुक्त राजेश पाटील यावेळी म्हणाले.
प्रास्ताविक करताना उप आयुक्त संदीप खोत यांनी प्लॅगोथॉन विषयी माहिती दिली. या उपक्रमामध्ये परिसरातील कचरा, प्लास्टिक तसेच इतर कचरा गोळा करुन एका ठिकाणी संकलित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने आवश्यक यंत्रसामुग्री आणि साधने पुरविली जाणार आहेत असे खोत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मानले.