Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रमहिलांचा मतदानांचा टक्का वाढविण्यासाठी चिंचवडमध्ये विशेष मोहिम

महिलांचा मतदानांचा टक्का वाढविण्यासाठी चिंचवडमध्ये विशेष मोहिम

‘’आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापुर्ण वातावरणातील निवडणुकींचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’’, अशी शपथ आज घेण्यात आली.

महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३३ मावळ लोकसभा अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या शीघ्र निदान शिघ्र उपचार या उपक्रमात लोकशाहीचा जागर व लोकशाही संदर्भात महिलांना शपथ देण्यात आली. यावेळी समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघात महिला मतदारांचे प्रमाण कमी आहे. समाज विकास विभागामार्फत महिलांना ईव्हीएमचे प्रशिक्षण देण्यात आले. आपल्या कुटुंबातील महिलांची मतदार नोंदणी झाली नसेल तर ती नोंदणी करावी. महिलांचे लोकशाहीमध्ये मोठे स्थान आणि योगदान आहे. महिला मतदारांचा टक्का वाढावा, यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

राज्यात स्त्री-पुरुष मतदारांचे प्रमाण ९२५ इतके आहे. महिलांचा मतनोंदणी आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी व मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाइन अँपवर ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करता येत आहे.

महिलांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढे यावे. आपल्या परिचयातील महिलांना देखील मतदार नोंदणी करण्याबाबत माहिती द्यावी. या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मतदानाची शपथ घेतली.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांचे प्रमाण वाढावे, यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये मोठ्या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी एसएमएस, आयव्हीआरएस कॉलिंगसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. पात्र महिलांनी मतदार नोंदणी करण्याबरोबरच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान करावे.

  • विठ्ठल जोशी, उपआयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी, चिंचवड विधानसभा मतदार संघ-२०५
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments