चिंचवड, पुणे — बंगल्याच्या सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाखांची लाच स्वीकारताना मंडलाधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ४) चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली.

मंडलाधिकाऱ्याचे नाव: सुरेंद्र साहेबराव जाधव (वय ५६) कलम: भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल
नेमकं प्रकरण काय?
वालेकरवाडी येथील ५३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते. या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम चार लाख ५० हजारांवर आली.
रंगेहात पकडत करवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचला. मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी चार लाखांची लाच स्वीकारली. ही रक्कम पार्किंगमधील कारमध्ये ठेवताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी कारमधून रक्कम जप्त केली असून, याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पुढील तपास सुरू
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.