पुण्यातील फ्लेक्सबाजीचे लोण आता थेट पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग आणि पिंपरी- चिंचवड शहरात येऊन पोहोचले आहे. अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा, अशा आशयाचे फलक लागले आहे. उद्या (गुरुवारी) जनतेने कोणत्या उमेदवाराला कौल दिला आहे, हे स्पष्ट होणार असताना आधीच अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे आमदार म्हणून फलक लागल्याने चर्चेला उधाण आले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका आणि पिंपरी चौकात अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स लागले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित, पवार आणि जयंत पाटील यांच्यासारखे दिगग्ज नेते चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ठाण मांडून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रचार सभा घेत रॅली काढली होती. चिंचवड मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते.
दरम्यान, काही खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेत भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या विजयी दाखवण्यात आल्या आहेत. तसेच, भाजपाच्या स्थानिक नेत्याच्या सर्वेत अश्विनी लक्ष्मण जगताप यांनाच आमदार म्हणून पसंती मिळाल्याने काही उत्साही कार्यकर्त्यांनी थेट फ्लेक्सबाजी करत अश्विनी लक्ष्मण जगताप या आमदार झाल्याचे फ्लेक्स लावले आहेत. याआधी पुण्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचेदेखील आमदार म्हणून फ्लेक्स लागले होते. त्याचेच लोण आता थेट पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि पिंपरीत पोहोचले आहे. जनतेच्या मनातील आमदार कोण? हे जाहीर होण्यासाठी काही तास बाकी असताना आमदारकीचे फ्लेक्स लागल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.