पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला वेग आला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य जाहीर सभा आज पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आली आहे.
ही जाहीर सभा शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता, आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात पार पडणार आहे. या सभेमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा, तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील विकासाचा सविस्तर रोडमॅप यावेळी मांडला जाणार असल्याने, मुख्यमंत्री काय भूमिका मांडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या जाहीर सभेला पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.
या सभेच्या आयोजनाबाबत माहिती देताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, ही सभा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
या जाहीर सभेसाठी पिंपरी-चिंचवड शहराचे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे, निवडणूक प्रमुख तथा चिंचवडचे आमदार शंकर शेठ जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे, विधानपरिषद सदस्य उमाताई खापरे, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सर्व भाजप अधिकृत उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


