पिंपरी पालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. पालिका आयुक्त राजेश पाटील हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. ‘शहरातील नागरिक आणि प्रशासनात सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरिता आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत,’ अशी माहिती आयुक्त पाटील यांनी पत्रकारांना दिली.
पालिकेतील प्रशासकीय राजवटीत जलदगतीने निर्णय व्हावेत, या हेतूने क्षेत्रीय कार्यालयनिहाय ८ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ‘जनसंवाद’ या उपक्रमातून नागरिकांशी संवाद साधण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
त्यानुसार, अ क्षेत्रीय कार्यालयासाठी सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, ब क्षेत्रीय कार्यालयासाठी बांधकाम परवानगी विभागाचे प्रमुख अभियंता मकरंद निकम, क क्षेत्रीय कार्यालयासाठी सहायक आयुक्त प्रशांत जोशी, ड क्षेत्रीय कार्यालयासाठी उप आयुक्त अजय चारठणकर, इ क्षेत्रीय कार्यालयासाठी सहशहर अभियंता सतीश इंगळे, फ क्षेत्रीय कार्यालयासाठी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, ग क्षेत्रीय कार्यालयासाठी उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर आणि ह क्षेत्रीय कार्यालयासाठी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या सर्व समन्वय अधिकाऱ्यांनी दर सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपस्थित राहून जनसंवाद सभेत सहभागी व्हावे, असे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकारी व सर्व विभागांचे अधिकारी या सभेस उपस्थित राहतील, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.
अशी असेल कार्यप्रणाली….
मुख्य समन्वय अधिकारी सर्व नागरिकांना मागील आठवडय़ात प्रशासकीय पातळीवर घेतलेले महत्त्वाचे निर्णय, राज्य शासन तसेच पालिकेच्या विविध योजना, महत्त्वाची परिपत्रके याविषयी माहिती देतील. नागरिकांना दालनामध्ये बोलावून त्यांची तक्रार नोंदवून घेतली जाईल. शक्य असल्यास तिथेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. सदर तक्रारींविषयी अतिरिक्त आयुक्त (१) यांच्याकडे दर मंगळवारी सकाळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल. आयुक्त म्हणजे प्रशासकांकडे दर शुक्रवारी संबंधित विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात येईल. आयुक्त तसेच सर्व अतिरिक्त आयुक्त दर सोमवारी कोणत्याही एका क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्वत: उपस्थित राहतील, अशी कार्यप्रणाली असेल, असे पालिकेने कळवले आहे.