मोशी येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामात कथित भ्रष्टाचार आणि वाढीव निविदेवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कामातील अनियमिततेचा निषेध करत शहरातील प्रमुख नगरसेवकांनी महापालिका भवनासमोर जोरदार घोषणाबाजी केली. “भ्रष्ट निविदा रद्द करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू,” असा इशारा लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला दिला आहे.
नेमका आक्षेप काय?
आंदोलक नगरसेवकांच्या मते, स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी काढण्यात आलेल्या निविदेचे दर अव्वाच्या सव्वा फुगवण्यात आले आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून ठराविक ठेकेदाराला लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आंदोलनातील प्रमुख मुद्दे आणि आरोप:
खर्चात मोठी तफावत: “एका रुपयाची वस्तू हजार रुपयांना दाखवून महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला जात आहे,” असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते भाऊसाहेब भोईर यांनी केला. महापुरुषांच्या नावाखाली होणारा हा भ्रष्टाचार छत्रपती संभाजी महाराज कधीही माफ करणार नाहीत, असेही ते म्हणाले.
ठराविक ठेकेदारावर मेहेरबानी का?:
नगरसेविका सुलभा उबाळे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आधीच जागेच्या बदलामुळे २० कोटी रुपये वाया गेले असताना, पुन्हा त्याच ‘धनेश्वर’ ठेकेदाराला वाढीव दराने काम का दिले जात आहे? तो महापालिकेचा जावई आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
प्रशासकीय उधळपट्टी: नगरसेवक संदीप वाघेरे
यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नसल्याचे सांगणारे प्रशासन, बोगस ठेकेदारांसाठी निधीची उधळपट्टी कशी करते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनाचा पवित्रा:
जर ही वादग्रस्त निविदा त्वरित रद्द केली नाही, तर रस्त्यावर उतरून अधिक तीव्र संघर्ष करण्याचा इशारा नगरसेवक नाना काटेयांनी दिला आहे.
चौकशीची मागणी
या आंदोलनात विश्वजीत बारणे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि स्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आली आहे.


