महाराष्ट्रातील कोरोनाचे निर्बंध उठवले आहेत. तब्बल दोन वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा जल्लोषात यात्रा- जत्रांना सुरुवात झाली आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या जत्रांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. जत्रेच्या निमिताने अनेक गावांमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबच बैलगाडा शर्यतींचेही आयोजन केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या पांगरी गावात नुकताच रोकडोबा महाराजांच्या यात्रा उत्सव पार पडला. यावेळी गावकऱ्यांनी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केलं होतं. या बैलगाडा शर्यतीत भरघोस बक्षिसासह , चक्क नागरिकांच्या मनोरंजनसाठी ‘चिअर गर्ल्सला’ आणण्यात आले होते. यामुळे गावातील बैलगाडा शर्यती खास आकर्षणाचा विषय ठरला आहे.
नववारी साडी, नाकात नथ घालत मराठमोळा साज परिधान करून या ‘चिअर गर्ल्स; बैलगाडा शर्यतीला उपस्थित होत्या. त्यांच्यासाठी स्वतंत्र स्टेजची उभारणी करण्यात आली होती. या स्टेजवर उभे राहत ‘चिअर गर्ल्स’ बैलगाडा शर्यतीत पहिल्या नंबरमध्ये येणाऱ्या बैलगाड्याच्या बारीनंतर मराठी गाण्यांवर थिरकत होत्या. आतापर्यंत क्रिकेटच्या सामान्य तोकड्या कपड्यांवर नाचणाऱ्या ‘चिअर गर्ल्स’ अनेकांनी बघितल्या होत्या. मात्र नऊवारी साडीत मराठमोळा लूक करत बैलगाडा शर्यतीत नाचलेल्या चिअर गर्ल्स पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यापूर्वी पांगरी गावाने जेव्हा बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती तेव्हा गावकऱ्यांनी बी बैलगाडा शर्यतीत बारीच्या धरणाऱ्या घोंडीची शर्यत भरवली होती. या प्रकरणी गावातील आयोजकांवर पोलीस कारवाई ही झाली होती.