पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून यापूर्वी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार स्मृतिचिन्हे देऊन सत्कार करण्याची प्रथा पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सन्मानचिन्हे खरेदी करण्यात आली आहेत. पालिकेच्या स्थायी समितीची बैठक ॲड. नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात करोना विषाणू सुरक्षा कवच योजनेच्या लेखाशीर्षातून आठ लाख रुपये ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ लेखाशीर्षावर वळविले आहेत. त्यातूनच सन्मानचिन्हे खरेदी करण्यात येणार आहेत. याबाबतच्या ऐन वेळच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. महापालिकेत सत्तेवर येताच भारतीय जनता पक्षाने उधळपट्टीला चाप लावणार असल्याचा निर्णय घेतला. काटकसर म्हणून पालिकेची डायरी छपाई बंद करण्यात आली. स्मृतिचिन्हे देण्याऐवजी पुस्तके भेट देण्याचा निर्णय घेतला; परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर निर्णयात बदल केला असून, पूर्वीप्रमाणे स्मृतचिन्हे खरेदी करण्याचे ठरविले आहे. आता सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्हे दिली जाणार आहेत. एक सन्मानचिन्ह ५७४ रुपये दराने बाराशे चिन्हे पुरविण्याचे काम चिंचवड येथील खासगी संस्थेला देण्यात आले आहे. हा खर्च कामगार कल्याण विभागाकडील सांस्कृतिक कार्यक्रम लेखाशीर्षातून खर्च करण्यात येणार आहे.
तरतूद अपुरी पडत असल्याने करोना विषाणू सुरक्षा कवच योजना लेखाशीर्षामधील तरतूदीत घट केली. त्यातील आठ लाख रुपये सांस्कृतिक कार्यक्रम लेखाशीर्षावर वळविले आहेत. आजच्या बैठकीत ७२ कोटी ६६ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यात भोसरीतील कबड्डी प्रशिक्षण केंद्रातील विद्युतविषयक कामांसाठी एक कोटी ४५ लाख रुपये, पिंपरीतील नवमहाराष्ट्र, पवनेश्वर आणि इतर मैदानावरील दिव्यांच्या नूतनीकरणासाठी ९१ लाख रुपये, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत फर्निचर व्यवस्था, निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे नूतनीकरण या प्रमुख कामांचा समावेश आहे. पाहणी दौऱ्यात आयुक्त राजेश पाटील यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, राजेंद्र राणे, देवन्ना गट्टूवार, रामनाथ टकले, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र चौधरी यांचा समावेश होता. प्राधान्याने या कामांकडे लक्ष देऊन ती विनाविलंब पूर्ण करावीत, असे आदेश पाटील यांनी या वेळी दिले.