Thursday, January 16, 2025
Homeगुन्हेगारी' त्या ' वादग्रस्त विधानावरून चंद्रकांत पाटील यांची पुन्हा जाहीर माफी

‘ त्या ‘ वादग्रस्त विधानावरून चंद्रकांत पाटील यांची पुन्हा जाहीर माफी

महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा जाहीर माफी मागितली आहे. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो,’ असे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पाटील यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, ती ही मागे घ्यावी . पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना वजा मागणीही त्यांनी केली आहे.

महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शिक्षण संस्था उभ्या केल्या, असे वादग्रस्त विधान पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी विधानाबद्दल माफी मागितली होती. पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती. पाटील यांच्यावरील शाई फेकण्याच्या घटनेनंतर भारतीय जनता पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली होती. तर विरोधकांकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याप्रकरणी आंदोलने, निदर्शने करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकावा, अशी मागणी केली आहे.

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महात्मा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत, याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. त्यांची मुक्तता करावी ,ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी. ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments