पिंपरी, दि. १ जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत लोंढे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवडसह राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संमतीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे यांनी दि. २९ जून २०२६ रोजी चंद्रकांत लोंढे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
चंद्रकांत लोंढे हे सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्ष संघटना अधिक बळकट करणे, सामाजिक न्याय विभागाचे कार्य राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, तसेच सामाजिक न्याय, समता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी आपण पार पाडणार असल्याचा निर्धार त्यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी चंद्रकांत लोंढे यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे सामाजिक न्याय विभागाचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


