महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला असता भाजपकडून ३, शिंदे यांची शिवसेना १, अजित पवारांची राष्ट्रवादी १ आणि काँग्रेसकडून १ उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. त्यानुसार काँग्रेसमधून चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रकांत हांडोरे यांच्यावर काँग्रेसनं पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे. गेल्या विधानपरिषद निवडणुकीत हांडोरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, हांडोरे यांनी पक्षावर विश्वास ठेवल्यानं पक्षानं त्यांना पुन्हा संधी दिली आहे.
चंद्रकांत हांडोरे यांनी मुंबईतील चेंबूरमधून माजी आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात हांडोरे यांनी सामाजिक न्याय मंत्री काम केलेलं आहे. हांडोरे यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.