Friday, September 11, 2026
Homeआरोग्यविषयकनिगडीतील चेंबर ठरले ‘डेथ ट्रॅप’! चेंबरमध्ये दोन कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू

निगडीतील चेंबर ठरले ‘डेथ ट्रॅप’! चेंबरमध्ये दोन कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू

विषारी वायूमुळे गुदमरल्याचा प्राथमिक अंदाज; वर्षभरापूर्वी याच परिसरात तीन कामगारांचा गेला होता जीव

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात लोकमान्य हॉस्पिटलजवळील BSNL च्या भूमिगत डक्ट/चेंबरमध्ये अडकून दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा, मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चेंबरमध्ये साचलेल्या विषारी वायूमुळे किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दोघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य राबवून दोन्ही कामगारांना चेंबरमधून बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

मृतांची नावे मनोज बाबुराव शिंदे (वय २६) आणि अमोल अशोक शिंदे (वय २०) अशी आहेत. दोघेही मूळचे सिद्धेश्वर, ता. औंढा, जि. हिंगोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

वर्षभरापूर्वीही याच परिसरात तीन कामगारांचा मृत्यू

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारण, साधारण वर्षभरापूर्वी याच परिसरात अशाच प्रकारच्या दुर्घटनेत तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतरही संबंधित ठिकाणी आणि अशा धोकादायक भूमिगत चेंबरमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

सुरक्षा साधनांबाबत प्रश्नचिन्ह

दरम्यान, रात्रीच्या वेळी चेंबरमध्ये नेमके कोणते काम सुरू होते, संबंधित कामगार कोणत्या संस्थेसाठी किंवा कंत्राटदारासाठी काम करत होते, तसेच त्यांच्याकडे आवश्यक सुरक्षा साधने होती का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

चेंबरमध्ये उतरण्यापूर्वी ऑक्सिजनची पातळी आणि विषारी वायूंची तपासणी करण्यात आली होती का? कामगारांना मास्क, सेफ्टी हार्नेस किंवा इतर आवश्यक सुरक्षा उपकरणे देण्यात आली होती का? असे अनेक गंभीर प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

घटनास्थळी तांत्रिक तपासणी करण्यात येत असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित यंत्रणा आणि कामाच्या ठेकेदाराची जबाबदारीही तपासली जाणार असल्याची शक्यता आहे.

एकाच ठिकाणी वर्षभराच्या अंतराने पुन्हा कामगारांचा जीव गेल्याने प्रशासन, संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी आणि कठोर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments