पीडब्ल्युडी, अन्य प्रशासकीय अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष
१८ जानेवारी २०२०,
चाकण ते भांबोली फाटा ते करंजविहीरे या रस्त्याचे हायब्रीड ऍन्युटी कार्यक्रमांतर्गत चालू असलेल्या विस्तारीकरण व नुतनीकरणाच्या कामामुळे प्रवासी, वाहनचालकांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. चाकण ते भांबोली फाटा पर्यंतच्या रस्त्त्याच्या काम गेले कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. हा सुमारे 11 किमीचा रस्ता इतका खराब झाला होता की मावळातल्या रस्त्यांसारखा फक्त फुफाटा आणि धुराळाच. जागोजागी डांबरीकरण खडलेले, रस्त्त्याची जागा खड्ड्यांनी घेतली होती. इतकी भयानक परिस्थिती रस्त्याची झाली होती की या रस्त्याने प्रवास करणारे विद्यार्थी, कामगार, शेतकरी, नागरिकांना, प्रवासी व मालवाहतूक करणार्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्त्याचे काम चालू आहे. पुढे आणखी सहा ते सात महिने हे काम चालणार आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणार्यांची अवस्था ’आगीतून निघून फुफाट्यात पडल्या’ सारखी अवस्था झाली आहे. कारण या कामाकडे पीडब्ल्युडी किंवा अन्य प्रशासकीय अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष. संबंधित कंत्राटदार वाटेल तसं आणि वाटेल तिथं काम करत आहे. कुठे रस्ता खोदणे, तर दुसरीकडेच मुरुमाचा भराव करणे किंवा चांगल्या दर्जाच्या रस्त्यावर मुरुमाचे ढीग टाकणे अशी स्वच्छंदी कामे चालू आहेत.
ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक त्रास, ज्या ठिकाणी रस्त्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे त्याठिकाणचा रस्ता केल्यास अडचण काय आहे. थोड्या थोड्या अंतराने रस्त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे काम करण्याचे काम लॉजिक आहे ते सर्वसामान्य माणसाला उलगडत नाही. याशिवाय कुठेही रस्त्यावर वाहतूक नियमन व सुरक्षेची काहीही काळजी व जबाबदारी घेतलेली दिसून येत नाही. संबंधित रस्ते बांधकाम विभाग प्रशासन झोपलंय का ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. एकुण सदर कामाचे संबंधित प्रशानाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामात अनियमितता आणि प्रवासी व वाहतुकीच्या सुरक्षेची कोणतीही काळजी या कामात घेतली जात नसल्याने नागरिकांना अफघातासारख्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. दोन दिवसांपूर्वी वराळे गावच्या हद्दीत एका बाजूला मुरुमाचे ढीग आणि रस्त्याच्या दुसर्या बाजूला भराव केल्याने अत्यंत अरुंद रस्ता झाला होता. अशा या रस्त्याच्या गलथान कामामुळे एक मालवाहतूक ट्रक रस्ता सोडून साइडच्या गटारात पडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही. परंतु संबंधित कंपनीचे नुकसान मात्र झाले असेल. दरम्यान आंबेठाण ते कोरेगाव फाटा हा रस्ता अत्यंत खराब व वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचा असल्याने तो रस्ता प्राधान्याने तयार करावा आणि ज्या ठिकाणी रस्त्त्याचे कोणतेही, कसेही काम चालू असेल तर या ठिकाणी वाहतूक नियमन व सुरक्षेची काळजी घेण्यात यावी अशी मागणी आंबेठाण, वराळे, भांबोली येथील नागरिकांनी केली आहे.