ओमिक्रॉनचा धोका असतानाच देशातील २७ जिल्ह्यांमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसत असल्याने केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी संबंधित राज्यांना अलर्ट केले असून आज तातडीचं पत्र लिहिलं आहे. त्यात स्थितीनुसार नाइट कर्फ्यू व अन्य निर्बंध लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
देशातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या लक्षात घेता संसर्गाचा वेग कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, त्याचवेळी काही राज्यांत अजूनही रुग्णसंख्या मोठी आहे. त्यातही ठराविक जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनत चालले असून हीच बाब गांभीर्याने घेत केंद्रीय आरोग्य सचिवांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
कोविडची गेल्या दोन आठवड्यांतील स्थिती पाहिल्यास तीन राज्यांमधील ८ जिल्ह्यांत कोविड पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के इतका झाला असून ७ राज्यांतील १९ जिल्ह्यांत हाच दर ५ ते १० टक्के यादरम्यान राहिला आहे. ही स्थिती पाहता या सर्व २७ जिल्ह्यांबाबत संबंधित राज्यांना आरोग्य सचिवांनी काही निर्देश दिले आहेत. या सर्वच जिल्ह्यांवर बारीक लक्ष ठेवण्यात यावे. समूह संसर्ग आढळल्यात तो भाग कंटनमेंट झोन म्हणून जाहीर करून त्यासंबंधी नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी. त्यात नाइट कर्फ्यू, अधिक लोकांनी एकत्र येण्यावर निर्बंध आणणे, विवाह सोहळा तसेच अंत्यसंस्कार यासाठी उपस्थिती मर्यादा निश्चित करणे, यासारखी पावले तातडीने उचलण्यात यावीत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राजेश भूषण यांनी पत्रासोबत संबंधित राज्यांची यादी जोडली आहे. त्यानुसार केरळ , मिझोराम आणि सिक्कीम या तीन राज्यांत गेल्या दोन आठवड्यांत कोविड पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे. या राज्यांबाबत अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णसंख्या नेमकी का वाढते आहे, याचा अभ्यासही तातडीने करावा लागणार आहे. देशात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर रुग्णसंख्या ३२ वर पोहचली आहे. त्यामुळे धोका वाढत असतानाच दुसरीकडे काही राज्यांत कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली असून त्यासाठीच केंद्राने संबंधित राज्यांना सतर्क केलं आहे.