‘पुणे रेल्वे स्थानकावरील भार हलका करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी हडपसर टर्मिनल येथून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे,’ अशी माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी शुक्रवारी दिली.
लाहोटी यांनी शुक्रवारी रेल्वेच्या लोणावळा ते दौंड मार्गावरील विविध कामांची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा उपस्थित होत्या. हडपसर टर्मिनलचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास करण्यात येत आहे. सध्या हडपसर येथून हडपसर-हैदराबाद ही एकच गाडी धावते. येत्या काळात तेथून जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचा निर्णय झाला आहे.
हडपसर टर्मिनल येथे जागेची कमतरता आहे. त्यामुळे भारत फोर्ज कंपनीची जागा ताब्यात घेण्याबाबत सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ती जागा ताब्यात मिळाल्यानंतर येथील संचलन वाढवणे शक्य होईल, असा दावा लाहोटी यांनी केला.पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी आणि चिंचवड आदी स्थानकात ‘निर्भया फंड’अंतर्गत ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांची क्षमता दोन मेगा पिक्सेल एवढी आहे. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांना वचक बसून गुन्ह्यांची संख्या घटेल, असा विश्वास लाहोटी यांनी व्यक्त केला.
या गाड्यांचा वेग वाढणार… ?
लोणावळा ते तळेगावदरम्यान सध्या प्रतितास ११० किमी वेगाने गाड्या धावत आहेत. याच टप्प्यात ताशी १२० किलोमीटर वेगाने गाडी चालविण्याची चाचणी शुक्रवारी झाली, तर उरळी ते पाटसदरम्यान सध्या १२० किलोमीटर वेगाने गाड्या धावतात. तेथे १३० किलोमीटर वेगाची चाचणी झाली. या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या. त्यामुळे येत्या काळात पुणे-दौंड मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
‘पुणे-दौंड मार्गाला उपनगरीय सेवेचा दर्जा देऊन तेथे लोकल सेवा सुरू करण्याच्या विषयाला मध्य रेल्वेने तूर्तास स्थगिती दिली आहे. या मार्गावर सध्या ‘डेमू’द्वारे प्रवासी सेवा दिली जात असून, तीच कायम राहणार आहे. या मार्गावर पुणे-लोणावळ्याप्रमाणे उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याचा कोणताही विचार नाही,’ असे अनिल कुमार लाहोटी यांनी स्पष्ट केले.
पिंपरी स्थानक हरित उर्जेवर
पुणे विभागातील पिंपरी, शिवाजीनगर आणि खडकी येथे रेल्वे स्थानकांवर सौर पॅनेलद्वारे उर्जा निर्मिती केली जात आहे. पुणे स्टेशन येथे सौर पॅनेल उभारणीचे काम सुरू आहे. पिंपरी स्थानकात निर्माण होणाऱ्या सौर उर्जेवर स्थानकातील सर्व विद्युत उपकरणे कार्यान्वित केली जात आहे. त्यामुळे पिंपरी स्थानक पुणे विभागातील पहिले ‘हरित स्थानक’ ठरले आहे.