२१ डिसेंबर २०२०,
UK अर्थात युनायटेड किंग्डममधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. युनायटेड किंग्डममध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. करोना व्हायरसच्या नवीन प्रकाराचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. युकेमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लागू केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तिथल्या विमानांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
२२ डिसेंबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत जी विमानं युकेहून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना करोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. विमान तळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
आजच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भातली मागणी केंद्र सरकारकडे केली होती. जे लोक ब्रिटनमधून भारतात येत आहेत त्यांना क्वारंटाइन करण्यात यावं आणि ब्रिटनच्या विमानांवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली होती. आता केंद्र सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. करोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आल्याने ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. तर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.